Saturday, August 11, 2012

दोन दिवस -मराठी कविता

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले

कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले

तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो

दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।

- नारायण सुर्वे

No comments:

Post a Comment